Rajmata Jijabai Shahaji Bhosale (12 January 1598 – 17 June 1674), the mother of Chhatrapati Shivaji Maharaj, founder of the Maratha Empire. Dinvishesh – 17 June 1674 | Raje Shivaji’s Mother Jijabai Demise.
१७ जून १६७४: आऊसाहेब निघाल्या……
राजमाता जिजाबाईंचे रायगडाखालील पाचाड या गावी दुःखद निधन. त्यांचा म्रुत्यु नवज्वराने झाला असे शिवदिग्वीजय या बखरीत नमूद आहे.
६ जून रोजी शिवराज्याभिषेकाचा मनोहारी सोहळा पाहिल्यानंतर १२ व्या दिवशी जिजाबाईंचे निधन झाले. शिवराज्याभिषेकानंतर निश्चलपुरी गोसावी या विघ्नसंतोषी तांत्रिकाने रायगडावर येऊन राज्याभिषेक सोहळ्यातील चुका व अपशकुन दाखवायला सुरुवात केली. तसेच पुढच्या काही दिवसांतही अपशकुन होतील अशी त्याने भविष्यवाणी केली. त्याच्या बोलाला फुलाची गाठ पडुन जिजाबाई १७ जून रोजी निवर्तल्या.
इस १६४२ मधे कर्नाटकात शहाजीराजांची भेट घेऊन जिजाबाई व बाल शिवबा महाराष्ट्रात परतले व त्यानंतर शिवाजीराजांच्या स्वराज्यविषयक हालचालींना सुरुवात झाली. जिजाबाई १६७४ पर्यंतच्या, शिवाजीराजांच्या जीवनात घडलेल्या घटनांच्या साक्षीदार होत्या. तिकडे कर्नाटकात त्यांचे थोरले पुत्र संभाजी शहाजीराजांकडेच राहिले व त्यांनाही कर्तृत्व गाजवले.
१६४९ मधे शहाजीराजांची आदिलशहाच्या कैदेतून सुटका, १६५९ मधे अफजलखानाचे प्रचंड संकट व त्यावर शिवाजीराजांनी केलेली मात, १६६३ मधे शाहिस्तेखानावर त्याच्याच छावणीत जाऊन केलेला धाडसी हल्ला, सुरतेची दोन वेळा केलेली लूट, १६६५-६६ मधे पुरंदरचा तह व नंतर आग्रा प्रकरण व तिथुन शिवाजीराजांनी केलेली स्वतःची अभुतपुर्व सुटका, तानाजी मालुसरेंना सिंहगड घेताना आलेले वीरमरण व शेवटी शिवराज्याभिषेक या प्रमुख व इतर अनेक चढ उतारांच्या, सुखदुखांच्या घटना जिजाबाईनी पाहिल्या. पुणे या उद्ध्वस्त झालेल्या गावाचा कायापालट जिजाबाईंनी केला. सुरूवातीला हे मायलेक खेड-शिवापूर येथे मुक्कामी होते. नंतर पुण्यात येऊन त्यांनी तिथल्या पुर्वी गाढवाचा नांगर फिरलेल्या जहागिरीवर सोन्याचा नांगर फिरवला. शहाजीराजांनी दादाजी कोंडदेव या हुशार व्यक्तीची नेमणूक करून त्यांना पुणे व परिसरांतील जहागिर्यांवर देखरेखीसाठी जिजाबाई व शिवाजीराजांच्या मदतीस ठेवले. जिजाबाईंनी न्यायनिवाड्याचे कामही पाहिले.
१६१० मधे शहाजीराजांशी विवाह, पुढे एकदा एका बिथरलेल्या हत्तीमुळे भोसले-जाधव गटात झालेली मारामारी व त्यातुन उद्भवलेली अप्रिय घटना, १६२९ मधे जिजाबाई गरोदर असतानाच त्यांचे वडील व भावांची निजामाच्या दरबारात हत्या झाल्याची बातमी, १६३३ ते १६३६ या काळात शहाजीराजांचा स्वराज्याचा एक अयशस्वी प्रयत्न व नंतर आदिलशहाने त्यांची कर्नाटकात केलेली रवानगी, अफजलखानाच्या दगाबाजीने संभाजीराजांचा झालेला म्रुत्यु (सुमारे १६५४-५५), १६५९ मधे अफजलखानाला शिवाजीराजे भेटायला जात असताना त्यांना संभाजीच्या म्रुत्युचा बदला घेण्याचा दिलेला सल्ला, १६६० मधे शिवाजीराजे पन्हाळगडावर जौहरच्या वेढ्यात अडकलेले असताना स्वतः शस्त्र घेऊन जौहरचा वेढा फोडायला निघालेल्या जिजाबाई, १६६४ मधे शहाजीराजांच्या म्रुत्युची बातमी समजताच सती जायला तयार झालेल्या जिजाबाई व त्यांना त्यापासून परावृत्त करणारे शिवाजीराजे, १६६५ मधे शिवाजीराजांनी महाबळेश्वरला जिजाबाई व सोनोपंत यांची केलेली सुवर्णतुला, १६६९ मधे विठोजी शिळिमकर या देशमुखांच्या मुलीच्या लग्नासाठी केलेली मदत या जिजाबाईंच्या जीवनातील आणखी काही घटनांचाही उल्लेख करता येईल.
म्रुत्युसमयी जिजाबाईंनी शिवाजीराजांसाठी २५ लाख होनांची पुरचुंडी मागे ठेवली. त्यांचे व्रुंदावन पाचाडला बांधले गेले. बहुतेक गडावरची हवा मानवत नसल्याने व प्रक्रुति अस्वास्थ्यामुळे शेवटची काही वर्षे त्या पाचाडलाच रहात होत्या. राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्या गडावर आल्या होत्या. त्यांच्या उत्तर क्रियेच्यावेळी शिवाजीराजांनी लाख रूपये खर्च करून महादाने केली.
शिवाजीराजांसारख्या युगपुरुषाला जन्म देणार्या, त्यांना घडवणार्या, अनेक आघात सोसूनही न डगमगता खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या राजमाता व एक व्रतस्थ स्त्री अशा जिजाबाईंना मानाचा मुजरा!!🙏
जयराम पिंड्ये या शहाजीराजांनी आश्रय दिलेल्या कवीने जिजाबाईंचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे:
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई, भली शोभली ज्यास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्विपाला, करी साउली माउलीशी मुलाला!!
:- सारंग
Leave a Reply