१३ जून १६६५ : इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह 13 June 1665 : The Treaty of Purandar took place between the Rajput ruler Jai Singh (commander of the Mughal Empire) and Maratha Chhatrapati Shivaji Maharaj.
परवाच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे शिवाजीराजे मिर्झाराजांच्या छावणीत आले. त्यांनतर २-३ दिवस ते तिथेच होते. यादरम्यान त्यांची मिर्झाराजासोबत बरीच चर्चा झाली. शेवटी दीर्घ चर्चेनंतर १३ जूनच्या रात्री शिवाजीराजे व मुघलांच्यात तहाची कलमे ठरली. ही छावणी पुरंदर किल्लापरिसरातच असल्याने हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो.
तहाची कलमे पुढीलप्रमाणे
१. महाराजांकडे १२ किल्ले त्यातील वसुलासह राहतील. यापुढे त्यांनी औरंगजेबाविरूद्ध बंडखोरी करू नये व मुघली मुलुख लूटू नये.
२. दख्खनमधे कुठलीही शाही कामगिरी महाराजांना सोपवल्यास ती त्यांनी पूर्ण करावी
३. संभाजीला मुघलांची पंचहजारी मनसबदारी देण्यात येईल. तो केवळ ८ वर्षांचा असल्याने त्याच्या वतीने नेतोजी पालकर असतील.
४. तळकोकणातील आदिलशहाचा ४ लाख होनांचा व बालाघाटावरील ५ लाख होनांचा मुलुख शिवाजीराजांना बहाल करून तसे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लाख होन खंडणी, वार्षिक ३ लाख होनांच्या हप्त्याने मुघलांना द्यावी.
५. महाराजांच्या ताब्यातील २३ किल्ले व त्या परिसरातील ४ लाख होन वसुलीचा मुलुख मुघल साम्राज्यात द्यावा.
१६६५ सालचा इतिहास असे सांगतो की, शिवाजीराजांना मुघलांपुढे तात्पुरती माघार घ्यावी लागुन २३ किल्ले द्यावे लागले व काही अटीही कबुल कराव्या लागल्या. मात्र, इतिहास पुढे जाऊन असेही सांगतो की, काही वर्षांतच हे सर्व २३ किल्ले शिवाजीराजांनी जिंकून घेतले. एवढेच नव्हे तर किमान २६० किल्ले जिंकुन घेतले. पुरंदर तह ही शिवाजीराजांची पूर्ण शरणागती नव्हती तर ती होती एका प्रजादक्ष राजाची चाणाक्षपणे घेतलेली तात्पुरती माघार.
शिवाय इथे एक मुद्दाही लक्षात घ्यावा लागतो. सुरूवातीला मिर्झाराजा शिवाजीराजांना अस म्हणाला की, “तुम्ही तुमच्याकडचे सर्वच किल्ले जर देणार असाल तरच तह करायला या अन्यथा मुघल सैन्य अस्मानी तार्यांप्रमाणे प्रचंड आहे. ते युद्ध करून तुमचे सर्व किल्ले जिंकतील.”
मग असे असताना शिवाजीराजांनी नेमकी अशी काय दीर्घ बोलणी मिर्झाराजाशी केली कि आधी सर्वच किल्ले द्या असे म्हणणारा मिर्झाराजा तहात केवळ २३ किल्ल्यांवर समाधान पावला?? इतिहासातुन याचे नेमके उत्तर मिळत नाही. काही गोष्टी गूढच राहतात.
मुघलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमधे सिंहगड, पुरंदर, प्रबळगड, लोहगड अशा काही प्रसिद्ध किल्ल्यांचा समावेश होता. तर शिवाजीराजांकडेच राहिलेल्या १२ किल्ल्यांमधे रायगड, राजगड व तोरणा अशा दुर्गम किल्ल्यांचा समावेश होता. याशिवाय १६६५ मधे महाराजांच्या ताब्यात आणखी काही किल्ले होते ज्यांचा पुरंदर तहात उल्लेख येत नाही. जसे की, शिवाजीराजांनी स्वतः बांधलेले प्रतापगड, मंडणगड तसेच, विशाळगड.
काही दिवसांनी पुरंदरच्या या तहाला मान्यता देणारे फर्मांन बादशहा औरंगजेबाने पाठवले.
१३ जून १६७०: मराठ्यांनी माळा (दोर) लावून लोहगड किल्ला काबीज केला.
काय योगायोग आहे बघा! १६६५ मधे १३ जून रोजीच शिवाजीराजांना लोहगड किल्ला पुरंदर तहात द्यावा लागला. तोच लोहगड १६७० मधे १३ जूनरोजीच स्वराज्यात परत आला. इथे एक जरा आश्चर्यात पाडणारी गोष्ट आहे ती म्हणजे, १६६५ च्या पुरंदर तहातल्या मुघलांकडे गेलेल्या २३ किल्ल्यांत लोहगडसोबत विसापूर किल्ल्याचाही उल्लेख आहे जो लोहगडाच्या समोरच आहे. मात्र १६७० मधे लोहगड परत स्वराज्यात आला तेव्हा विसापूरही स्वराज्यात आला की नाही याचा काहीच उल्लेख नाही. मात्र, वस्तुनिष्ठ अंदाजाने आपण म्हणू शकतो की, दोन्ही किल्ले समोरासमोर असल्याने १६७० मधेच लोहगडबरोबरच विसापूरही शिवाजीराजांनी जिंकला असावा.
:- सारंग
Leave a Reply