Dinvishesh 02 July 1649 | Raje Shivaji gifted land to Shri Morya temple Chinchwad
२ जुलै १६४९: शिवाजीराजांनी चिंचवडच्या श्रीमोरेश्वराला फुलझाडांसाठी जमीन इनाम दिली.
दोन महिन्यांपूर्वीच शहाजीराजांची आदिलशहाच्या कैदेतुन सुटका झाली होती. इथुन पुढची काही वर्षे शिवाजीराजांनी स्वराज्याच्या अंतर्गत कारभारावर लक्ष दिले.
शिवचरित्रात चिंचवडचा उल्लेख काही महत्वाच्या ठिकाणी येतो. पहिला उल्लेख येतो तो सुमारे १६३७-३८ साली. त्यावेळी जिजाबाईंनी चिंचवडला अन्नछत्राची व्यवस्था करून दिली होती. त्याचसुमारास त्यांनी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या पूजेअर्चेसाठी नंदादीपाची व नेवैद्याची उत्पन्ने करून दिली.
शिवाजीराजांनी १६४८ मधे पुरंदर किल्ला ताब्यात घेतला तेव्हा तिथले किल्लेदार होते महादजी नीळकंठराव सरनाईक. यांची मुलगी चिंचवडच्या देवांची सून होती.
इस १६६५ मधे मिर्झाराजा जयसिंगाने मुघल सेनानी दाऊदखान व कुत्बुद्दीनखान यांना लोहगडाकडे जाण्याची आज्ञा केली तेव्हा वाटेत या दोघांच्या सैन्याने चिंचवडला तळ दिला होता.
मात्र एकदा असे झाले की, जेजुरीच्या देवस्थातील गुरवांचे भांडण सुरू होते. इस १६७६ सुमारास चिंचवडच्या देवांनी या गुरवांच्या भांडणात गरज नसताना हस्तक्षेप केला व दोघा जणांचे हात तोडून त्यांना सिंहगडावर नेऊन ठेवले. शिवाजीराजांना ही बातमी समजल्यावर त्यांनी देवांना खरमरीतपणे लिहिले की ‘तुमची बिरदे आम्हास द्या व आमची बिरदी तुम्ही घ्या’
म्हणजे महाराज त्यांना उपरोधिकपणे म्हणाले की, ‘तुमच काम आम्ही करतो, आमच तुम्ही करा’
सिंहगडाच्या किल्लेदारालाही महाराजांनी फटकारले की, ‘तू माझा चाकर आहेस की देवांचा?’ लगेच त्या कैद्यांची महाराजांनी सुटका केली.
नको तिथे लुडबुड केली व चुका केल्या तर महाराज आपल्या लोकांचे एवढेच नाही तर इतर आदरणीय लोकांचेही कान पिळत असत. शासनही करत असत.
चिंचवडचे संत मोरया गोसावी यांचा परामर्ष शिवाजीराजे घेत होते!
:- सारंग
Leave a Reply