• Home
  • Mother’s Recipes
  • Beaches
  • Waterfalls
  • Downloads

TrekBook Blog

Your Personal Guide to India

Amazon Sale

You are here: Home / Incredible India / Information / Star Gazing – आकाशगंगादर्शन एक अदभूत अनुभव

Star Gazing – आकाशगंगादर्शन एक अदभूत अनुभव

By Guest 4 Comments | Last Updated December 23, 2023

 

“आकाशगंगा दर्शन” एक वेगळा अनुभव

दिनांक- २८ जानेवारी रात्री ७:३० ते २९ जानेवारी पहाटे ५:३०

ठिकाण- जावण गाव,मुळशी,पुणे. 

Star Gazing overnight program organized by ‘Sanshodhan’ the ‘Story of Astronomical discoveries’ Just 50 kms from Pune discover sky in the dark nights is fun

jayu saneA warm Welcome to Upcoming Guest Author on TrekBook India …Jayu loves exploring Forts & Wild Forests in India. Her specialty is fluent writing in Marathi liked by all.

With lot of thanks to Jayu to be associated with TrekBook India and pushing her blogging  to new heights … With Warm Wishes …

star gazing by jayu sane

२३ जानेवारीच्या कळसुबाई ट्रेक ला अजून एक आठवडा सुद्धा होत नाही तोवर लगेच संशोधन प्रेसेंटस  “आकाशगंगा दर्शन” ह्या इव्हेंट चा मेसेज ट्रेकिंग च्या “फोना”ग्रुप वर येऊन धडकला. हो नाही हो नाही करत माझ्यासाठी नाही परंतु माझी मुलगी प्रभासाठी मी या इव्हेंट ला जायचे ठरवले. मनोज राणेसरांनी आमची नावे दिली. अचानक जायचे ठरल्यावर  धावपळ आलीच.  आम्ही२८ जानेवारी ला संध्याकाळी ६ वाजता घर सोडले. महेश पाठक आणि त्यांचे कुटुंब, सचिन चव्हाण यांचे कुटुंब यांच्या २ गाड्या आणि सुरेखा खंडागळे यांच्या गाडीत मी माझी मुलगी राणे सर आणि त्यांचा मुलगा कृष्णा आणि अजून एक प्रभाचा वर्गमित्र प्रथम असे सगळे आम्ही मुंबई-पुणे हायवेने निघालो. जावण गाव पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर आहे. सोमाटणे फाटा सोडल्यावर काही अंतर गेल्यावर आमचा एक टर्न चुकल्यामुळे आम्ही ४ कि. मी. पुढे गेलो. एका गावात योग्य मार्ग विचारून आणि जीपीएस मुळे पुन्हा ४ कि.मी. मागे येऊन योग्य ठिकाणी पोहोचलो. त्यावेळी माझी मैत्रीण सुरेखा हिने तिची स्वतःची चारचाकी गाडी भारी चालवली. तिचा घाटामध्ये गाडी चालवायचा सराव झाला असे राणे सर गंमतीने म्हणाले. 

७:३० वाजता आम्ही जावण गावात खंडोबा मंदिराजवळ उतरलो. श्री.मयुरेश प्रभुणे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार त्यांनी तशी सगळी तयारी करूनच ठेवली होती.  गेल्या गेल्या आम्ही आमच्या बॅगा गाडीतून काढून घेतल्या. तिथे मोट्ठे ३ दुर्बीण संच आधीच लावले होते. आम्ही २०-२५ जण वेळेवर पोहोचलो होतो शिवाय अजून पुण्यातून २५ जणांची बस येणार होती. 

गेल्या गेल्या दुर्बिणीतून मंगळ ग्रह पाहता आला. मी लहानपणी मुंबईच्या नेहरू तारांगणातून हे असं पाहिलं होत परंतु त्यावेळी मी कोणकोणते ग्रह पाहिले होते ते यावेळी तरी मला आठवत नव्हते. मंगळाला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालावयास  ६८७ दिवस लागतात तर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावयास  २४तास ३६ मिनिटे लागतात.

दुर्बिणीजवळ  रांगा लावून शिस्तीत सगळे ग्रह पाहण्याचा आनंद  घेत होते. थोड्यावेळाने राहिलेले मेम्बर्स आले. ते देखील दुर्बिणीजवळ रांग लावून ग्रह तारे पाहण्यात मग्न झाले.आमचा एक ग्रह पाहून झाला होता दुर्बिणीजवळ उगाच गर्दी करण्यापेक्षा आम्ही तिथे असलेले खंडोबा मंदिर गाभाऱ्यात जाऊन पाहिले. मंदिर अतिशय नीटनेटके आणि स्वच्छ होते. विजेची उत्तम सोय होती.

खंडोबा मंदिर – जावण गाव,मुळशी,पुणे

khandoba temple javan gaon

त्यानंतर आम्ही आमचे जेवणाचे डब्बे काढून जेवण करून घेतले.

having dinner during sky gazing

तोपर्यंत मयुरेश प्रभुणे यांच्या टीम ने दुर्बिणीत शुक्र ग्रह सेट करून ठेवला होता तो आम्ही पहिला

सूर्यमालेतील शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे. या ग्रहास देखिल आंतर ग्रह म्हणतात. कारण हा ग्रह देखिल सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे. याच मुळे हा ग्रह देखिल आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो.या ग्रहावरील वातावरण अतिशय दाट असल्याने सूर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो.

शुक्र ग्रह पाहून झाल्यावर श्री. मयुरेश प्रभुणे सर जेव्हा  तिथे जवळच मोकळ्या सुरक्षित जागी प्रत्यक्ष आकाश दर्शन घडवित होते तेव्हा मात्र आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. लेझरटॉर्च च्या सहायाने आम्हाला प्रत्यक्ष आकाशातील ग्रह तारे याविषयी माहिती देत होते. त्यांचे विज्ञानाविषयीचे ज्ञान जबरदस्त होते. माझ्या बुद्धीपलीकडचे होते हे सगळे परंतु माझी मुलगी प्रभा हे सगळे उत्सुकतेने ऐकत होती आणि पाहत होती मी जसे जमेल तसे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मी फक्त जोतिष शास्त्रापुरते १२ राशींचा तात्पुरता विचार करीत असे.

अवकाश निरीक्षणाची रात्र ही अमावस्येची रात्र असावी त्यानुसार अमावस्याच होती आणि मंदिराच्या आवारातील सगळे दिवे बंद करण्यात आले होते. त्यामुळे तारे स्पष्ट दिसत होते. साधारणपणे वर्षभर पद्धतशीर अवकाश निरीक्षण करणाऱ्यांनाच सर्व अवकाशस्थ वस्तूबद्दल माहिती होते. परंतु तरीदेखील एखाद्या नवख्या अवकाश निरीक्षकास सुरवातीस काही गोष्टी ओळखण्यास कठीण जातात मलाही ते कठीण जात होते.  आकाशामध्ये चमकणारी प्रत्येक गोष्ट ताराच असेल असे नाही. म्हणून अवकाशामध्ये चमकणारी वस्तू काय असेल त्यासंबंधीची कल्पना येण्यासाठी खालील गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

कृत्रिम उपग्रह ( सॅटेलाईट्स ) – ही अवकाशामध्ये चमकणारी वस्तू आपणास वेगाने जाताना दिसेल. कमी वेळामध्ये ही वस्तू आपणास अवकाशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी जाताना दिसेल. जास्तीत जास्त एक मिनिटभर ती आपणास दिसेल.

ग्रह – आपणास माहीत आहेच तरी देखिल व्यवस्थित निरीक्षण केल्यास आपणास जाणवेल की ग्रह चमकत नाहीत. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो तर ग्रह सूर्याचा प्रकाश परावर्तित करतात. तसेच ताऱ्यांच्या  मानाने ते कितीतरी पट पृथ्वीच्या जवळ असल्याने त्यांचा प्रकाश स्थिर जाणवतो.

तारे – ग्रहांच्या मानाने तारे कितीतरी पट दूर असल्याने त्याच्या पासून येणारा प्रकाश पृथ्वीवरील वातावरणाच्या माध्यमातील धुलिकणांमुळे अडला जातो व इतरत्र पसरला जातो. पृथ्वीवरून त्यांना पाहताना त्याचा प्रकाश हालताना आणि तुटक मिळतो. म्हणूनच तारे चमकताना किंवा लुकलुकताना दिसतात.

उल्का – सर्वात जास्त वेगाने जाणारी तसेच क्षणात अदृश्य वस्तू म्हणजे उल्का. एखाद्या धूमकेतूची परिभ्रमण कक्षा जर पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेला छेदून गेली असल्यास, पृथ्वी सूर्य प्रदक्षिणा करताना त्या विशिष्ट जागेतून जाताना त्या धूमकेतूच्या मागे द्रव्यामधील धूलीकण, दगड इतर वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या दिशेने आकर्षित होतात व पृथ्वीवर आदळण्या आधीच वातावरणामध्ये घर्षणाने नष्ट होतात. त्यांनाच उल्का असे म्हणतात. प्रचंड वेगामध्ये वातावरणामध्ये प्रवेश केल्यावर घर्षणाने त्या उल्का पेट घेतात. परंतु आकारमानाने लहान असल्यामुळे जमिनीवर पोहचण्या आधीच त्या नष्ट होतात. कधीतरी आकाशात पाहताना अचानक एखादा तारा तुटल्यासारखे आपणास जाणवते त्याच उल्का.

धूमकेतू –  धूमकेतू ओळखणे तर सर्वात सोपी गोष्ट. सर्वसाधारणपणे सूर्यमालेत प्रवेश करताच धूमकेतूमागे आपणास शेपटी असलेली दिसेल. ही शेपटी बर्फाच्छादित धुलीकणांची असते व जसजसा तो धूमकेतू सूर्याच्या अधिक जवळ येऊ लागतो,त्यावेळेस हे बर्फाच्छादित धुलीकण विरघळून धूमकेतू पासून अलग होतात आणि धूमकेतूमागे धुलीकणांची एक शेपटी तयार होते. त्यामुळे धूमकेतू एखाद्या झाडूसारखा दिसू लागतो. काही आठवड्यांमध्ये तो आपली सूर्य प्रदक्षिणा संपवून पूर्ववत दूर जाऊ लागतो व त्याबरोबर त्याची शेपटी देखिल लहान होत होत अदृश्य होते.

विश्वाच्या निर्मितीच्या बऱ्याच संकल्पना आतापर्यंत निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी मांडल्या आहेत. या सर्व संकल्पना त्या-त्या शास्त्रज्ञांनी त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षावरून तसेच कल्पना  करून मांडल्या आहेत. कुठल्याही गोष्टीची निर्मिती ही त्या गोष्टीच्या निर्मितीच्यावेळी असलेल्या परिस्थितीवरून काढली जाते. पण विश्वाच्या निर्मितीनंतरच इतर सर्व गोष्टी निर्माण झाल्या त्यामुळे विश्वाची निर्मिती कशी झाली असावी हे सांगणे तितकेसे सोपे नाही.

साधारण पणे १३ ते २० अब्ज वर्षापूर्वी एक मोठ्या स्फोटातून सध्याच्या विश्वाची निर्मिती झाली असावी असा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे.सुरुवातीला म्हणजेच साधारणपणे १३ ते २० अब्ज वर्षापूर्वी संपूर्ण विश्व एका बिंदूवत स्वरूपात होते. त्यानंतर झालेल्या त्याच्या महास्फोटामूळे त्यातील सर्व द्रव्य अंतराळामध्ये फेकले गेले. त्यापासूनच पुढे एक-एक गोष्ट तयार होत सध्याचे विश्व आपण पाहत आहोत.

साधारण १९३१ दरम्यान बऱ्याच खगोलसंशोधकांना त्यांच्या अवकाश निरीक्षणामध्ये असे आढळून आले की अंतराळातील सर्वच आकाशगंगा आपापल्या स्थानापासून सरकत असून त्या एकमेकांपासून दूर जात आहेत. आकाशगंगांचे एकमेकांपासून दूर जाणे हे ज्याप्रमाणे एखाद्या रबरी फुग्यावर काही चित्रे काढून तो जर फुगा फुगविला तर ता फुग्यावरील चित्रे ज्याप्रमाणे एकमेकांपासून दूर जाताना दिसतील त्याच प्रमाणे या अंतराळातील आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत. याचाच अर्थ त्या भूतकाळामध्ये कधीतरी एकमेकांच्या जवळ अथवा एकत्रित असाव्या ज्या नंतर काही कारणास्तव एकमेकांपासून दूर जाऊ लागल्या. त्यांचा हा सिद्धांत बऱ्याच प्रमाणात महास्फोटाशी जुळणारा होता. या दोन सिद्धान्तावर पुढे असा निष्कर्ष लावण्यात आला की महास्फोटानंतर त्या स्फोटातील द्रव्य अंतराळामध्ये फेकले गेले. या द्रव्यापासूनच पुढे आकाशगंगांची निर्मिती झाली.

एकामागोमाग एक उत्तम आम्हाला समजेल अशी माहिती मयुरेश देत होते आणि ५० लोकांचा समुदाय शांतपणे  गोधंळ न करता ते ऐकत होता आणि अवकाशात पाहत होता. ध्रुवतारा कसा ओळखायचा हे खूप छान समजून सांगितले. वर्षभरात आपणास जाणवेल की सर्व तारे पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात धृवतारा हा असा एक तारा आपणास जाणवेल की ज्याने वर्षभरात आपली जागा स्थिर ठेवली आहे. पृथ्वीचा अक्ष थोडासा कललेला आहे हे आपणास माहीत आहे. पृथ्वीच्या अक्षाच्या मध्यापासून एक काल्पनिक सरळ रेषा काढल्यास त्या रेषेवरच धृव ताऱ्यांचे  स्थान आहे. म्हणून वर्षभरात आपणास इतर तारे पृथ्वीभोवती गोलाकार फिरल्याचे जाणवतात, परंतु धृव तारा स्थिर जाणवतो. २० नक्षत्रांची माहिती दिली.

व्याधSirius  ,अगस्ती-Canopus,  मित्र- Rigil Kentaurus,स्वाती -Arcturus ,अभिजित-Vega ब्रम्हहृदय-Capella,राजन्य- Rigil,प्रश्वा,Procyon, काक्षी-Betalgeuse ,अग्रनद Achernar, मित्रक-Hadar ,श्रवणAltair,ऍक्रक्स-Acruxरोहिणी-Aldebaran,ज्येष्ठा-Antares,चित्रा-Spica,प्लक्ष-Polllux,मीनास्य-Fomalhaut,हंस-Deneb,मिमोसा-Mimosa

रात्रीच्या वेळेस जर चंद्र अवकाशामध्ये असेल तर त्याच्या प्रकाशित बाजूने सरळ रेषा ओढल्यास ती बरोबर आपणास पश्चिम दिशा दाखवेल. तसेच जर त्याच्या काळोख असलेल्या बाजूकडून सरळ लंब रेषा ओढल्यास ती आपणास पूर्व दिशा कळेल.परंतु रात्रीच्या वेळेस अवकाशामध्ये चंद्र नसेल तर दिशा ओळखण्यासाठी काही तारकासमुहांची देखिल मदत होते. अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस तारकासमुहांद्वारे दिशा ओळखता येतात.

इंग्रजीमधील ‘एम’ किंवा ‘डब्ल्यू’ आकाराप्रमाणे दिसणाऱ्या आणि  शर्मिष्ठा तारकासमुहाच्या मधील पाच प्रमुख ताऱ्यापैकी तिसऱ्या  व चौथ्या ताऱ्यामधून  सरळ लंबरेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवताऱ्याकडे  जाईल.सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख ताऱ्यापैकी पहिल्या दोन ताऱ्यांना  जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवताऱ्याकडे जाते. मृग तारकासमुहामध्ये असलेले मृगाचे तोंड नेहमीच उत्तर दिशा दर्शविते.सिंह तारकासमुहामध्ये असलेले सिंहाचे तोंड नेहमीच पश्चिम दिशा दर्शविते.तसेच वरीलपैकी कोणताही तारकासमूह अवकाशामध्ये दिसत नसल्यास आपणास ओळखता येत नसल्यास साधारण दोन-तीन तास ताऱ्यांचे  निरीक्षण केल्यास आपणास त्यांच्या बदललेल्या जागेवरून त्यांची उगवण्याची पूर्व दिशा लक्षात येईल.

आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती ‘मंदाकिनी’ नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे. अवकाशातील सर्वच गोष्टीचे एकमेकांपासून अंतर फारच असल्याने दोन अवकाशीय गोष्टींमधील अंतर प्रकाशाच्या वेगाने मोजले जातात. आपल्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेमधील आहेत याचाच अर्थ आपल्या आकाशगंगेचा आकार प्रचंड मोठा आहे. या सर्वांना सामावून घेणाऱ्या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशाला पोहोचायला जवळजवळ १ लाख वर्षे लागतात.

आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आपल्या सूर्यापेक्षाही हजारो पट आकाराने मोठे तारे,तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक गोष्टी आहेत. लहान मोठ्या असलेल्या ह्या आकाशगंगा जवळपास १ कोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरामध्ये पसरलेल्या आहेत.

तिथले काही जणांनी तर सर अवकाशाची माहिती देत होते तिथेच म्याट टाकून अवकाशाचे निरीक्षण केले.मला हे आकाशनिरीक्षण सगळं अद्भुत वाटत होते. मला तर असे वाटत होते की एखाद्या अवकाश यानाद्वारे आपण अवकाशाची सफरच करीत आहोत की काय इतक्या छान रीतीने मयुरेश सर समजून सांगत होते जरा डोळ्यावर झोप येत होतीच तरीही आवडत होते . रात्री १२ च्या पाहिलेले अवकाश आणि पहाटेला दिसणारे अवकाश यात फरक असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

mayuresh prabhune star gazing program

रात्रीचा १ वाजला होता. आता चहा चा ब्रेक झाला. मयुरेश सरांची टीम सगळळी तरुण पिढी होती.  आणि अतिशय उत्साहाने सगळे सरांना सहकार्य करत होते. कारण मोठमोठाले दुर्बीण संच सारखे सेट करावे लागत होते. कारण आम्ही पाहणारे नवखे होतो. आम्ही आपला त्या दुर्बीण संचाला हात लावून च तारे निरीक्षण करत होतो. मयुरेश सरांनी चहा बनवायला शिकवलेल्या एका मुलीने चहा बनवला आणि ५० जणांच्या मोट्ठ्या ग्रुपला आणून आणून दिला कारण आम्ही आता तिथल्या खंडोबा मंदिरात स्लाईड शो बघण्यासाठी एकत्रित जमलो होतो. परंतु बऱ्याच लोकांना झोप आवरत नव्हती.  जरा सर येईस्तोवर एक पडी  मारावी असा विचार करून कोणी टेन्ट काढले कोणी मंदिरातच आपापल्या म्याट काढल्या आणि चहा पित बसलो. छोटी मंडळी जरा झोप आली म्हणून लुडबुड करत होती. कारण त्यांना हा आकाश निरीक्षणाचा पहिलाच अनुभव होता.

मुली कुठेही गेल्या तरी पटकन ऍडजस्ट होतात. सरांच्या टीम मधल्या मुलीने तिथे ५० जणांचा चहा बनवून सगळ्यांच्या हातात आणून दिला.  आम्ही साडेसातला आल्यापासून मयुरेश सर सतत उभे आणि कार्यरत  होते तरीही थकलेले  दिसत नव्हते की चिडत नव्हते याचे मला नवल वाटे. काहींनी सर येईस्तोवर आणि स्लाईड शो सुरु होईस्तोवर एखादी डुलकी मारली असावी. २:३० च्या दरम्यान मयुरेश सर आता एक वाक्य बोलून गेले. की मी जर २ ते अडीच तास उभा राहून बोलनार असेल काही माहिती सांगणार असेल तर तुम्ही फक्त बसून ऐकायला काही हरकत नाही. आम्ही काय समजायचे ते समजून गेलो आणि झोप येत असून काहीजण म्याट वर आडवे झालेले उठूनच बसले. न चिडता शांतपणे खूप संयमाने आम्हाला झोपेतून खाडकन जागे केले. थंडी तर खूपच होती परंतु आम्ही बसलो असल्याने आम्हाला जास्त थंडी जाणवत होती.

श्री.मयुरेश प्रभुणे सरांनी स्वतःविषयी माहिती देताना जे सांगितले ते ऐकून सर्वांना खूप कौतुक वाटले. कारण ते विज्ञान शाखेचे विद्यार्थी नव्हते. फक्त आवड आहे म्हणून या क्षेत्रात वळले. आणि इतरांना मार्गदर्शन करून विज्ञानाची गोडी लावली. त्यांची मराठी भाषा जशी अस्खलित तसेच इंग्रजी भाषा देखील उत्तम होती. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये विज्ञान पत्रकार म्हणून आहेत. इंग्रजी व मराठी नियतकालिकात सिटीझन सायंटिस्ट म्हणून आहेत. सेंटर ऑफ सिटीझन सायन्स चे कारवाहक आहेत. १३ वर्षे विज्ञान लेखन केले आहे. भारतीय मान्सून चा सर्वंकष अभ्यास करणाऱ्या “प्रोजेक्ट मेघदूत” चे संचालन केले आहे. हौशी आकाशनिरीक्षक. भारतीय अवकाश कार्यक्रमाचा अभ्यास आणि वार्तांकन. साधी राहणी हुशार विचारसारणी असे अनेक पैलू आम्हाला पाहावयास मिळाले.  

स्लाईड शो मधून त्यांनी खगोलशास्त्रज्ञांविषयी सांगायला सुरुवात केली.

आर्यभट, वराहमिहीर,ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, अश्यांची माहिती सांगितली. आर्यभटभारताचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात विहार करू लागला. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताठ व्हावी अशी ही घटना पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव होते’आर्यभट’आर्यभट हा भारताचा महान खगोलविद्वान होता, खगोलीय गणिती होता,खगोलशास्त्राचा प्रणेता होता. आर्यभटाचा जन्म शके ३९८ ( इ. स. ४७६ ) मध्ये पाटलीपुत्र येथे झाला. त्याचे बालपण व उर्वरित आयुष्यकाल ह्याच नगरीत व्यतीत झाला. खगोलशास्त्रज्ञ म्हणून आर्यभटाचे कर्तृत्व असामान्य आहे.

आर्यभटीय ग्रंथ-आज उपलब्ध असलेल्या भारतीय खगोलशास्त्रीयग्रंथात पहिल्या आर्यभटाच्या ‘आर्यभटीय’ किंवा ‘आर्यसिद्धांत’ ह्या ग्रंथाहून दुसरा प्राचीन ग्रंथ नाही.’आर्यभटीय’ हे नाव त्याला आर्यभटानेच दिले आहे. आर्यभटाचे शिष्य वराहमिहीर,लल्ल वगैरे त्यास ‘आर्यसिद्धांत’ म्हणून संबोधायचे. खगोलविद्वानांनी त्यांच्या ग्रंथरचनेतील भाग आपल्या विवेचनासाठी घेतला.

पहिल्या आर्यभटानंतर एक थोर खगोल शास्त्रज्ञ भारतात होऊन गेला. वराहमिहीरचा जन्म शके ४१२ ( इ. स. ४९० ) मध्ये झाला असावा. वराहमिहीर अवंती येथे वास्तव्य करीत असे. त्याने यवन देशात भ्रमंती करून खगोलशास्त्रविषयक ज्ञान संपादन केले असा एक प्रवाद आहे. परंतु त्यात तथ्य नाही. वराहमिहीराने ज्या विषयांवर लेखन केले आहे ते विषय भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पूर्वीही हाताळले आहेत. त्यामुळे वराहमिहीरावरील आरोप टिकण्यासारखा नाही.

ब्रम्हगुप्त हा एक प्रतिभाशाली भारतीय खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचा जन्म शके ५२० (इस. ५९८) मध्ये झाला.ब्रम्हगुप्त व्याघ्रमुख राजाच्या राज्यसभेत खगोलशास्त्रज्ञ होता. व्याघ्रमुख राजा उत्तर गुजरातचा प्रमुख होता.

महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य ह्याचा जन्म शके १०३६ ( इ. स. १११४ ) मध्ये झाला.भास्कराचार्याचे सर्व शिक्षण त्याचे वडील मोरेश्वर यांच्याजवळ झाले. ते स्वतः एक पारंगत खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी करणग्रंथ व जातकग्रंथ लिहिले. ज्ञानसंपन्न वडिलांच्या सानिध्यात भास्कराचार्यावर चांगले संस्कार झाले व तो विविध शास्त्रांत निष्णात झाला.

त्या काळात अत्याधुनिक साधने उपलब्ध नसतानाही गॅलिलिओ, आईन्स्टाईन,न्यूटन यांनी कसकसे शोध लावले याविषयी ते सांगत होते. या ससंशोधकांनी कसे शोध लावले असतील त्याचा आपण फक्त विचारच करू शकतो.

पहाटेचे ४:३० वाजले होते. पहाटे अवकाश कसे दिसते ते पाहण्याची उत्सुकता आता लागली होती. रात्री आणि पहाटे ताऱ्यांच्या दिशांमध्ये झालेले बदल स्पष्टपने दिसत होते. एक क्षण विश्वासच बसत नव्हता. सकाळी दुर्बिणीतून शनी हा ग्रह पहावयास मिळाला आणि ज्युपिटर देखील पाहावयास मिळाला.

ज्युपिटर म्हणजे गुरु ग्रह पहिला. सूर्यमालेतील पाचवा ग्रह गुरू.  गुरू म्हणजे एक श्रेष्ठ स्थान. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरू आहे. कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास साधारणतः १,४२, ९८५ कि. मी. आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्या पृथ्वी सारख्या अकरा पृथ्वी या ग्रहाच्या व्यासावर ओळीने सहज बसू शकतील. त्याचे सूर्यापासूनचे अंतर ७७८, ४१२, ०१० कि. मी.आहे.गुरू ग्रहांच्या चंद्राप्रमाणे शनी या ग्रहाच्या कड्यांचे देखिल सर्वप्रथम दर्शन गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून घेतले. प्रचंड आकाराचा असून देखिल याची घनता पाण्याहून कमी आहे. समजा जर एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल.

लहान मोठ्या असंख्य खडकांपासून शनी ग्रहाची कडी निर्माण झाली आहेत. कधी एके काळी शनीच्याच एखाद्या चंद्राचा स्फोट होऊन त्यापासून ही कडी निर्माण झाली असावीत. वस्तुतः या कड्यांची संख्या असंख्य असली तरी प्रामुख्याने या कड्यांची सात निरनिराळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.अतिशय कमी तापमानामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित आहेत. या कड्यांची जाडी जवळपास १० ते १५ कि. मी. आहे. शनी ग्रह त्याच्या अक्षाशी साधारण २८ अंशांनी कललेला असल्यामुळेच पृथ्वीवरून आपणास त्याची कडी व्यवस्थित दिसतात. अन्यवेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते, तेव्हा त्याची कडा जवळजवळ अदृश्य होते व त्याजागी शनीला छेदणारी एक बरीक रेषा आपणास दिसते.

शनीला एकूण ३० उपग्रह आहेत. त्यामधील टायटन आकाराने बुध ग्रहा एवढा आहे.

श्री.मयुरेश सर म्हणाले की अवकाश संशोधनासाठी कोणत्याही शाखेची व्यक्ती सहभागी होऊ शकते. आकाशगंगा दर्शनाची माहिती जशी जमेल तशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मयुरेश प्रभुणे सरांनी आवर्जून सांगितले की प्रत्येक गोष्टीची थोडी सवय थोडा अभ्यास केला की सगळं काही जमते. आपण तर पुण्यात राहतो. पुण्यात अश्या गोष्टींसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध आहेत.आपली पिढी खूप भाग्यवान आह.  या बाबतीत. पहाटेचे ५:३० वाजले. मयुरेश सरांच्या टीम ने पुन्हा एकदा ५० लोकांना चहा दिला आणि आम्ही आवरता आवरता ६ वाजता तिथून रवाना झालो. ट्रेकिंग करते  निसर्गावर, गडकिल्ल्यांवर ब्लॉग लिहिते  पण या विषयावर मी कधी लिहीन असे वाटले नव्हते. जिथे गरज होती तिथे माहिती शोधून शोधून तुमच्यापुढे आणली आहे. चला तर मग एकदा तरी अवकाश संशोधनाचा भाग होऊयात. राशींविषयी, साडेसातीविषयी, ग्रहणाविषयी बऱ्याच जणांना समज गैरसमज होते. त्याविषयी  चर्चा करून ते मयुरेश सरांनी दूर केले. माझ्यासारख्या विज्ञानाची जास्त आवड नसलेल्या व्यक्तीमध्ये  अवकाशाविषयी आवड निर्माण होणे म्हणजेच मयुरेश सर करीत असलेल्या अवकाश संशोधनामध्ये खारीचा वाटाच. अवकाशवर्णाची सुवर्णसंधी श्री मयुरेश प्रभुणे सर यांनी आम्हाला दिली त्यासाठी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे खूप आभार. 

 

12 Best Stargazing places near Mumbai and Pune | A Complete Stargazing guide

Filed Under: Information Tagged With: camping, one day trek

Comments

  1. jayuu sane says

    January 31, 2017 at 6:34 am

    thank you

    Reply
  2. Harshad says

    January 31, 2017 at 9:57 am

    Excellent blog, earn lot of information regarding star’s & galaxy. I will eagerly attend the session next time.

    Reply
  3. Jayesh Ladani says

    January 31, 2017 at 4:35 pm

    Do publish an English or Hindi translation for people like me,j who are not at all fluent in Marathi language. ( If possible )

    Reply
    • Mahesh says

      March 9, 2017 at 1:06 pm

      Hi Jayesh, Thank you for reading TrekBook.in. As on now Trekbook is hobby website supported by friends like Jayu, so if someone is willing to translate it, he/she is most welcome to joint the TrekBook team. Rgds, Mahesh

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact me

Contact Mahesh
About me

Good Read

Places in Pune
Backpack list - India
Travel Pack - India
Swiss from India

Archives

Interesting buy

Best Tent

We at Wikipedia

Where on Wiki ?

Copyright © 2025 ·TrekBook India

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.Accept Reject Read More
Privacy & Cookies Policy

Privacy Overview

This website uses cookies to improve your experience while you navigate through the website. Out of these, the cookies that are categorized as necessary are stored on your browser as they are essential for the working of basic functionalities of the website. We also use third-party cookies that help us analyze and understand how you use this website. These cookies will be stored in your browser only with your consent. You also have the option to opt-out of these cookies. But opting out of some of these cookies may affect your browsing experience.
Necessary
Always Enabled
Necessary cookies are absolutely essential for the website to function properly. This category only includes cookies that ensures basic functionalities and security features of the website. These cookies do not store any personal information.
Non-necessary
Any cookies that may not be particularly necessary for the website to function and is used specifically to collect user personal data via analytics, ads, other embedded contents are termed as non-necessary cookies. It is mandatory to procure user consent prior to running these cookies on your website.
SAVE & ACCEPT
Go to mobile version